गंगापूर पोलीस ठाण्यासमोर मद्यधुंद तीन तरुणांचा धिंगाणा

Foto
गंगापूर (प्रतिनिधी) गंगापूर शहरात शनिवारी भरदिवसा घडलेल्या एका प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गंगापूर पोलीस ठाण्यासमोर तीन मद्यधुंद तरुणांनी नग्न अवस्थेत गोंधळ घालत धिंगाणा घातल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवकांनी पोलीस स्टेशन परिसरात आरडाओरडा करत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. आठवडे बाजार असल्याने परिसरात मोठी गर्दी होती. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. 

अनेकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केल्याचीही चर्चा होती. घटनेदरम्यान पोलिसांनी तत्काळ कठोर कारवाई न केल्याचा आरोप काही नागरिकांनी केला.  या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, संबंधित युवकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली का, तसेच त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली याबाबत उशिरापर्यंत अधिकृत माहिती मिळाली नव्हती.